अभिनेत्री भाग्यश्रीकडून खंत व्यक्त; म्हणाली, ‘माझा नवरा सुरुवातीच्या दिवसात मला’…

‘मैने प्यार किया’ या चित्रपटाच्या माध्यमातून रातोरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर भाग्यश्रीने कमी काळात प्रचंड मोठा चाहतावर्ग तिच्याकडे खेचून घेतला. त्यामुळे आजही तिची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही.

एकेकाळी भाग्यश्रीसोबत लग्न करण्याची अनेक दिग्गज अभिनेत्यांची इच्छा होती. मात्र, भाग्यश्रीने हिमालय दासानी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे एका कार्यक्रमात भाग्यश्रीने तिच्या वैवाहिक जीवनाविषयी अनेक खुलासे केले आहेत.

अलिकडेच भाग्यश्री आणि हिमालय या दोघांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमाचा होस्ट मनीष पॉल याने भाग्यश्रीला तिच्या वैवाहिक जीवनाविषयी काही प्रश्न विचारले. यात लग्नानंतर तिच्या सासरचं वातावरण कसं होतं, असा प्रश्न त्याने विचारला.

त्यावर, लग्नानंतर कित्येक वर्ष पती हिमालय तिच्याकडे सतत एकाच गोष्टीवरुन तक्रार करायचे असं तिने सांगितलं. “लग्नानंतर मी सासरी गेले. त्यावेळी मला स्वयंपाक येत होता. मात्र, पोळ्या (चपाती) व्यवस्थित येत नव्हत्या. त्यामुळे हिमालय यांच्या मनात कायम एक नाराजीचा सूर होता.

तू आईसारख्या पोळ्या करत नाही, अशी तक्रार ते कायम करायचे”, असं भाग्यश्री म्हणाली. पुढे ती म्हणते, “यांच्या घरात प्रत्येक जण खवैय्या आहे. सकाळी स्वयंपाक व्हायचा. मग चहा केला जायचा. चहा संपत नाही तर पुन्हा स्वयंपाकाच्या तयारीला हे लोक लागायचे.

यांची ही पद्धत पाहून मला कधी कधी आश्चर्य वाटायचं की हे लोक किती खातात.” दरम्यान, भाग्यश्रीने अलिकडेच पती हिमालय यांच्यासोबत एका रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळीदेखील तिने तिच्या वैवाहिक जीवनाविषयी अनेक खुलासे केले होते.