हो, मी लग्नाआधीच प्रेग्नंट होते, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची कबुली

अभिनेत्री दिया मिर्झा वयाच्या 39 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढली. 15 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर दियाने वैभव रेखीसोबत लगीनगाठ बांधली. लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच दियाने बेबी बम्पसह फोटो शेअर करत थेट मालदीव्सहून गुड न्यूज दिली. त्यामुळे दिया लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

दियाच्या फोटोवर एका इन्स्टाग्राम युझरने थेट लग्नाआधीच प्रेग्नन्सी जाहीर का नाही केलीस? असा सवाल विचारला. त्यावर उत्तर देताना दियाने लग्नाआधी गरोदर असल्याचं अप्रत्यक्षपणे कबूल केलं आहे.

इन्स्टाग्राम कमेंटमध्ये दियाला सवाल – “चांगली गोष्ट आहे. अभिनंदन, पण प्रॉब्लेम हा आहे की तिने महिला पुरोहिताच्या साक्षीने लग्न करुन पूर्वग्र मोडण्याचा प्रयत्न केला. मग तिने लग्नाआधीच गरोदर असल्याचं जाहीर का नाही केलं? लग्नानंतरच गर्भधारणा ही परंपरा आपण पाळतोय असं नाही का वाटत? लग्नाआधी महिला गरोदर का राहू शकत नाहीत?” असा लाखमोलाचा सवाल पूजा चांडक नावाच्या महिलेने विचारला.

दिया मिर्झाचं उत्तर काय? – “इंटरेस्टिंग प्रश्न. पहिलं म्हणजे आम्हाला मूल होणार आहे, म्हणून आम्ही लग्न केलं नाही. आम्हाला आयुष्य एकत्र घालवायचं असल्यामुळे आम्ही लग्न करणार होतो. लग्नाची तयारी करत असताना आपल्याला बाळ होणार असल्याचं आम्हाला समजलं. म्हणजे, हे लग्न गर्भधारणेमुळे झालेलं नाही.

वैद्यकीय कारणांमुळे सुरक्षिततेची हमी मिळेपर्यंत आम्ही प्रेग्नन्सीची बातमी फोडली नाही. ही माझ्या आयुष्यातील अत्यानंदाची गोष्ट आहे. मी अनेक वर्ष या गोष्टीची वाट पाहत होते. त्यामुळे वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त कुठल्याही कारणासाठी ते लपवण्याचा प्रश्नच येत नाही.” असं दियाने कमेंटला उत्तर देताना स्पष्ट केलं.

चार वर्षांनी लहान वैभवशी दुसरा विवाह – 15 फेब्रुवारीला उद्योगपती वैभव रेखी याच्यासोबत दिया मिर्झाचा विवाह झाला. दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. वैभव हा दियापेक्षा चार वर्षांनी लहान आहे. सध्या ते वाद्र्यातील पाली हिल भागात राहतात. वैभव हा इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. दियाने आपल्या नात्याविषयी जाहीर कबुली लग्न होईपर्यंत दिली नव्हती. मात्र ते 2020 मध्ये भेटल्याचं बोललं जातं. लॉकडाऊनच्या काळात ते एकत्रच राहत होते.

नवऱ्याची पहिली मुलगीही सोबत – दिया सध्या वैभवसोबत हनिमूनला आहे. वैभव आणि त्याची पहिली पत्नी सुनैना यांना समीरा नावाची एक मुलगी आहे. समीरा सध्या दिया आणि वैभवसमवेत मालदीव्समध्ये आहे.