बेगम करीना कपूर खान पुन्हा चर्चेत आहे. होय, दुस-या मुलाला जन्म दिल्यानंतर बेबो पुन्हा कामावर परतली आहे आणि ‘स्टार वर्सेस फूड’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Star vs food: Kareena Kapoor Khan) इतकेच नाही तर या शोच्या एका खास एपिसोडमध्ये ती खास पिझ्झा बनवताना दिसणार आहे.
तशी बेबोला कूकिंगची वगैरे फार आवड नाही. फावल्या वेळात तिची ही आवड सैफू भागवतो. पण आता चर्चेत राहायचे आणि काम करायचे म्हटल्यावर असे शो करावे लागणारच. असो, तर या शोमध्ये करिनाने एक मोठा खुलासा केला. होय, झोपताना कोणत्या तीन गोष्टी जवळ बाळगतेस? असा प्रश्न या शोदरम्यान तिला केला गेला
यावर बिनधास्त बेबोचे बिनधास्त उत्तर ऐकून सर्वच थक्क झालेत. झोपताना मला तीन गोष्टी जवळ हव्याच, असे बेबो म्हणाली. या तीन गोष्टी कोणत्या तर पहिली म्हणजे वाईन, दुसरी म्हणजे पायजामा आणि तिसरी गोष्ट कोणती तर तिचा सैफू अर्थात सैफ अली खान.
यापुढे तिने गमतीत असेही म्हटले की एक वेळ तिसरी गोष्ट म्हणजेच सैफ सोबत असेल किंवा नसले तरी जास्त काही फरक पडत नाही, पण बाकी दोन गोष्टी म्हणजेच पायजमा आणि वाइन मला हव्याच असतात. यावरून करीनाला वाईन आणि पायजमा किती प्रिय आहेत हे दिसून आले.
शोमध्ये करिनाने दुस-या प्रेग्नंसीदरम्यानचे अनुभवही सांगितले. दुस-यावेळी गरोदर असताना मला सतत पिज्जा आणि पास्ता खाण्याची इच्छा होत होती. इतकी की, सैफ आणि तैमूर दोघेही माझ्या या पिज्जा आणि पास्ता प्रेमाला वैतागले होते, असे ती म्हणाली.
घरातलं किचन तैमूर व सैफला खूप आवडतं. त्यामुळे ते सतत किचनमध्ये वेळ घालवतात. वेगवेगळे पदार्थ बनवतात. त्यामुळे किचन डिपार्टमेंट त्यांचे आहे.म्युझिक डिपार्टमेंट मात्र मी सांभाळते. सैफ व तैमूरला दोघांनाही जॅझ म्युझिक आवडते. त्यांची ही आवड मी पूर्ण करते, असे करिनाने हसत हसत सांगितले.
‘स्टार्स व्हर्सेस फुड’ या शोबद्दल सांगायचे तर हा शो डिस्कव्हरी प्लस या वाहिनीवर येत्या15 एप्रिलपासून प्रदर्शित होणार आहे. करण जोहर, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, प्रतिक गांधी हे कलाकारही या शोमध्ये दिसणार आहेत.

.