तुम्हाला माहीत आहे का, कियारा आडवाणीच्या मावशीला सलमान खानने केलंय डेट

बॉलिवूडच्या सर्वात सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींबद्दल बोलताना, कियारा आडवाणीचे नाव नक्कीच घेता येईल. २०१४ मध्ये ‘फगली’ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अनेक वर्षांच्या मेहनतीने तिने स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. कियाराने आपल्या सिनेमांतून ती वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारू शकते हे सिद्ध करून दाखवलं आहे. कियारा आडवाणी आज ३१ जुलै रोजी २९ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने तिच्याबद्दल फारशा माहीत नसलेल्या गोष्टी आज आम्ही सांगणार आहोत.

सलमान खानच्या सांगण्यावरून कियाराने बदलले मूळ नाव

कियाराचे वडील जगदीश आडवाणी हे मुंबईत राहणारे सिंधी व्यापारी आहेत. तिची आई जिनेवीव जाफरी एक शिक्षिका आहे. कियाराला एक लहान भाऊ आहे. तिचे खरे नाव आलिया आडवाणी आहे जे नंतर बदलण्यात आले. कियारने तिचा पहिला सिनेमा रिलीज होण्याआधीच आलिया हे नाव बदलून कियारा ठेवले होते.

सलमान खान ने कियाराला हा सल्ला दिला होता कारण आलिया भट्ट सिनेमांमध्ये आधीच काम करत होती. कियाराचे हे नाव ‘अंजाना अंजानी’ सिनेमातील प्रियांका चोप्राच्या पात्रावरून घेतले गेले होते. कियाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सिनेसृष्टीतील नसली तरी तिच्या कुटुंबाचे कनेक्शन बॉलिवूडमधल्या दोन मोठ्या कलाकारांशी नक्कीच आहे. कियाराचे आजोबा हमीद जाफरी हे प्रसिद्ध कलाकार सईद जाफरी यांचे लहान भाऊ होते.

त्यांचे पहिले लग्न कियाराच्या आजीशी झाले होते, ज्या ब्रिटीश महिला होत्या. यानंतर हामिद यांनी दुसरं लग्न भारती गांगुलीशी केले. भारती या अशोक कुमार यांची मुलगी होती. भारती यांनी कियाराची आई जिनेवीव यांना वाढवले. अशाप्रकारे, कियाराचे तिच्या आईच्या बाजूने सईद जाफरी आणि अशोक कुमार यांच्याशी संबंध आहेत. कियाराची आई जिनेवीव सुपरस्टार सलमान खान ची बालपणीची मैत्रीण आहे.

दोघंही वांद्रे येथे राहत होते आणि लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. जिनेवीवनेच कियाराची मावशी शाहीन आणि सलमानची भेट घालून दिली होती. कियाराने एका मुलाखतीत सांगितले होते की, फार पूर्वी सलमानने कियाराची मावशी शाहीनला डेटही केले होते. कियाराने सांगितले की, सलमान आणि शाहीनचं हे पहिलं रिलेशनशिप होतं.

कियाराच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर, तिने शेवटचे ‘लक्ष्मी’ आणि ‘इंदू की जवानी’ या सिनेमांत काम केले. आता लवकरच कियाराचा ‘शेरशाह’ सिनेमा १२ ऑगस्टला रिलीज होणार आहे. याशिवाय, कियारा कार्तिक आर्यनसोबत ‘भूलभूल्लैया २’ आणि वरुण धवनचसोबत ‘जुग जुग जिओ’ मध्ये दिसणार आहे.