ज्या अभिनेत्रीच्या प्रेमात प्रभुदेवाने आपल्या पत्नीला सोडलं, तिने आता दुसऱ्या सोबतच थाटलाय साखरपुडा..

दाक्षिणात्य चित्रपट वर्तुळामध्ये सेलिब्रिटींच्या कलाकृतींप्रमाणंच त्यांच्या खासगी आयुष्याचीही चर्चा सातत्यानं होत असते. सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याविषयी वाटणारं कुतूहल ही काही नवी बाब नाही. त्यातच कोणा एका प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या रिलेशनशिपची माहिती समोर आली, की चर्चांना फाटे फुटलेच म्हणून समजा. 

आता म्हणे साऊथ सेंसेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा (Nayanthara)हिनं तिच्या आयुष्यभराच्या जोडीदाराची निवड करत त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. अर्थात ही बातमी अनेकांच्याच भुवया उंचावत आहे. कारण यापूर्वी नयनताराचं नाव डान्सिंग माएस्ट्रो प्रभुदेवाशी जोडलं गेलं होतं. 

पण, आता मात्र नयनतारानं एका टिव्ही शोमध्ये निर्माता- दिग्दर्शक विग्नेश शिवन (Vignesh Shivan) याच्यासोबत आपल्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केलं आहे. आपला साखरपुडा झाल्याच्या वृत्तालाही तिनं दुजोरा दिला आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका प्रोमो व्हिडीओमध्ये नयनतारा आपल्या साखरपुड्याबद्दल बोलताना दिसत आहे. 

विग्नेशनं आपल्याली जी अंगठी दिली आणि जी आपल्या हातात आहे ती साखरपुड्याचीच अंगठी आहे, असंही तिनं सांगितलं. 2015 मध्ये ‘राऊडी धान’च्या दरम्यान एकत्र काम करताना नयनतारा विग्नेशच्या प्रेमात पडली. 

काही दिवसांपूर्वीच विग्नेशनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला होता. यामध्ये अंगठी असणाऱ्या एका महिलेचा फक्त हातच दिसत होता. तेव्हापासून ही कोण, असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करुन गेला. 

नयनतारा आणि प्रभुदेवा यांचं रिलेशनशिप चित्रपट वर्तुळात एकेकाळी चर्चेचा विषय ठरलं होतं. दाक्षिणात्य कला जगतातील ही दोन नावं एकत्र आली खरी, पण त्यांच्या नात्याला कायमच वादाची किनार होती. नयनतारासाठी प्रभुदेवानं वैवाहिक नात्यातूनही दुरावा पत्करला होता. प्रभुदेवाचं हे विवाहबाह्य नातं अखेर संपुष्टात आलं. ज्यानंतर नयनताराच्या आयुष्यातत विग्नेश आला आणि त्यांचं नातं बहरलं.