रोहित शेट्टीचं बिंग फुटलं! चित्रपटातील कार स्टंट असे होतात शूट, पाहा व्हिडीओ

दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या चित्रपटांतील अॅक्शन सीक्वेन्स आणि जबरदस्त कार स्टंटसाठी ओळखला जातो. रोहितच्या कॉप सीरिज चित्रपटांमध्येही तुफान अॅक्शन सीन्स पाहायला मिळाले आहेत. लवकरच त्याचा सूर्यवंशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रोहित सध्या त्याचा आगामी चित्रपट सर्कसच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

ज्यात बरेच अॅक्शन सीन्स असणार आहेत. पण याआधीच रोहितच्या कार स्टंटचं बिंग फुटलं आहे. एका व्हिडीओतून रोहित शेट्टीच्या चित्रपटातील कार स्टंट कसे चित्रित केले जातात हे समोर आलं आहे. अभिनेता रणवीर सिंगनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

ज्यात रोहित शेट्टी एक क्लोन कार चालवताना दिसत आहे. या व्हिडीओत रणवीर म्हणतो, ‘देशातला सर्वात मोठा स्टंट दिग्दर्शक’ रणवीरचं हे वाक्य संपतं ना संपतं तेवढ्यातच रोहित शेट्टी कार घेऊन रणवीर जवळ येतो. तेव्हा त्याला समजतं की, रणवीरनं त्याचा व्हिडीओ शूट केला आहे. तो म्हणतो, ‘अरे तू शूट करत आहेस?’

हा व्हिडीओ पाहिल्यावर समजून येतं की, स्क्रीनवर ज्या कारची टक्कर दाखवली जाते ते सर्व या क्लोन कारचे व्हिज्युअल एफेक्ट असतात. त्या खऱ्याखुऱ्या कार नसतात. या व्हिडीओमध्ये सेटवर अशा प्रकारच्या अनेक कार असलेल्या पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना रणवीरनं लिहिलं, ‘हे आपल्या कामाला खूपचं गंभीरतेनं घेतात.’

हा व्हिडीओ रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट ‘सर्कस’च्या सेटवरील आहे. रणवीर सिंगनं आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओवर अभिनेता अर्जुन कपूरनं सुद्धा कमेंट केली आहे. त्यानं लिहिलं, बाबा हे पाहिल्यावर मला असं वाटतं की, मी सर्कसची आणखी एक एंट्री घ्यायला हवी. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटात रणवीर सिंग, जॅकलीन फर्नांडिस आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहेत.